Type Here to Get Search Results !

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा,, नागरिकांनी सतर्क रहावे....


 

कर्जतची खान/ प्रतिनिधी ; *अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

   भारतीय हवामान खात्याने  दिलेल्या सूचनेनुसार,  रायगड जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

     *प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना*

    राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,  तलाठी, ग्रामसेवक, आणि पोलीस पाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.     

      जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय साधून बचाव कार्यासाठी तयारी केली आहे. 

   आवश्यकता भासल्यास,नागरिकांना सुरक्षित निवारा किंवा मदत शिबिरांमध्ये हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेषतः, समुद्रकिनाऱ्याजवळील गावांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि भरती-ओहोटीच्या वेळा तपासून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

         *नागरिकांना प्रशासनाचे आवाहन*

     जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.      

      शासन आणि प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे तयार असून, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, गरज असल्यासच घराबाहेर पडावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा. या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments