कर्जत ची खान/ कर्जत तालुक्यातील टेंभरे-आंबीवली येथील रिवाईल्ड सॅच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्टमधून चोरीला गेलेले विदेशी पक्षी आणि ११.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल कर्जत पोलिसांनी केवळ १५ दिवसांत हस्तगत करत दोन चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणात कर्जत पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना १७ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांनी ट्रस्टच्या लोखंडी पिंजऱ्याची कडी तोडून ७ आफ्रिकन ग्रे पॅरोट, १ ब्ल्यू गोल्ड मकाव आणि १ स्कार्लेट मकाव या मौल्यवान विदेशी पक्ष्यांची चोरी केली होती. आफ्रिकन ग्रे पॅरोट हे अत्यंत बुद्धिमान पक्षी असून, त्यांच्या किंमती सुमारे ७५ हजार रुपये प्रती पक्षी इतकी आहे. ब्ल्यू गोल्ड मकाव (२ लाख) व स्कार्लेट मकाव (४ लाख) हे पक्षी संग्रहालय व पाळीव बाजारात अत्यंत लोकप्रिय मानले जातात
. २ ऑगस्ट रोजी पहिला आरोपी अनिल रामचंद्र जाधव (रा. वावंढळ, खालापूर) याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून दुसऱ्या आरोपीचा तपशील मिळालाराजेशसिंग माहि उर्फ समशेरसिंग (रा. महिपालपूर, दिल्ली) याला चेन्नई, तामिळनाडू येथे शोधून काढून अटक करण्यात आली. त्याच्याकडून सर्व पक्षी हस्तगत करण्यात आले असून, एकूण ११.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment
0 Comments