॥जय जय रघुवीर समर्थ॥
आज श्री दासनवमी.
श्री समर्थ रामदासांनी पंधरा दिवस आधी पुर्व सूचना देऊन इ.स.१६८२ ला माघ वद्य नवमीला सज्जनगडावर देह ठेवला. तेंव्हापासून माघ वद्य नवमी ' दासनवमी ' म्हणून ओळखली जाते. आपण मनाचे श्लोक, दासबोध किंवा त्यांचे इतर काव्य रचना जेंव्हा वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्याला असे वाटत असते की जणू प्रत्यक्ष समर्थच आपल्याला ते सांगत आहेत. संतांच्या वाणीचा हा प्रभाव असतो कारण ते त्यांच्या स्वानुभवाचे बोल असतात. समर्थांनी तर देह ठेवण्याआधी आपल्या शिष्यांना दिलेल्या अखेरच्या संदेशात स्पष्ट सांगून ठेवले आहे कीं ते या जगांत त्यांच्या ' दासबोध ' या ग्रंथ रूपाने निरंतर वास करून आहेत. माघ व. नवमीला समर्थांनी तीन वेळा मोठ्यांदा रामनामाची गर्जना केल्यानंतर त्यांची प्राणज्योत त्यांच्या शरीरातून बाहेर पडली व समोरच्या राममूर्तीत प्रविष्ट झाली.
दुपारी साडे बारा वाजता त्यांनी अशा प्रकारे देह ठेवला. समर्थांच्या अग्नीसंस्कारास अफाट जनसमुदाय गडावर लोटला होता. छत्रपती संभाजी महाराज स्वतः जातीने हजर होते. तिस-या दिवशी अस्थी गोळा करतांना समर्थांची स्वयंभू समाधी जमीनीतून वर आली. खाली समाधी आणि वरती तंजावरहून आणलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान याच्या मूर्ती असलेले दगडी मंदिर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेले आहे. समर्थ समाधी रुपाने सज्जनगडावर आजही आहेत व भाविकांना त्याचे प्रत्यंतर अनेक प्रकारांनी येत असते.
तेथील समाधी मंदिरावर पुढील श्लोक आहे.....
सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदारश्रृंगापरि ।
नामे सज्जन जो नृपे वसविला श्रीउरशीचे तिरी ।
साकेताधीपती कपि भगवती हे देव ज्याचे शिरी ।
तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥

Post a Comment
0 Comments